#MurderofTeachingFraternity
आदरणीय प्रेसिडेंट सर,
सस्नेह दंडवत,
(फक्त नमस्कार आपणास कमीपणा वाटला असता म्हणून झोपून दंडवत घालतोय)
थोड्याच वेळापूर्वी होळीच्या भोवतीने बोंबलणाऱ्या लहान पोरांना पाहताना गेल्या तीन महिन्यातील सिंहगडच्या प्राध्यापकांची अवस्था आठवली म्हणून व काल आणि आज आम्ही आपल्या फार्म हाऊसवर आपणास भेटायला होतो पण आपण भेटला नाहीत म्हणून सरळ पत्रच लिहितोय.
खूपच सुरेख बांधलाय हो फार्म हाऊस.. NDA च्या गेटवरच्या आर्मीच्या लोकांना आम्ही चक्क खोटे सांगून आत आलो की आम्ही मातेच्या मंदिरात जाण्यासाठी आलो आहोत ते. नाहीतर उन्हात फिरून काळपटलेल्या चेहऱ्याने त्या गंजक्या स्पेण्डर वरून तुम्हाला भेटण्यासाठी चाललो आहोत असं जर त्या आर्मीवाल्याना सांगितले असते तर तिथेच त्यांनी चोर समजून चोप दिला असता.
आम्ही आलोत तेव्हा तुम्हाला तुमच्या सिक्युरिटी गार्डने आपणास बहुदा सांगितले असावेच. पण तुम्ही आत बोलावले नाहीत. कदाचित अचानक येणारे पाहुणे तुम्हाला आवडत नसावेत. त्यामुळे आम्ही बाहेरच उभे राहिलो.
आपल्या फार्म हाऊसच्या भिंती किती उंच आहेत सर. वर चढून पाहता येणे शी शक्य नाही. कॅम्पाऊंट वॉलच्या फटींमधून आम्ही थोडा डोकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला आपला आलिशान बंगला, आलिशान गाड्या, सुंदर गार्डन आणि हो महत्वाचे म्हणजे पेट हाउस ही दिसले. त्या पेट हाऊस मध्ये नक्की कोणता प्राणी तुम्ही पाळला आहे ते काही पाहायला मिळाले नाही मात्र दोन-तीन प्राणी बाहेर हुंदडताना दिसली पण ती माणसांसारखीच वाटत होती. पाठीमागे स्विमिंग पूल आहे असेही कळाले पण पाहता आले नाही. बरे झाले तुम्ही स्विमिंग पूल पुढे बांधला नाही ते नाहीतर माझ्यासारख्याला पोहल्यावाचून राहवले नसते (पगार नाही कमीतकमी एंटरटेनमेंट तरी झाली असती..!)
आर्मी च्या संरक्षणात असतानाही आपण 10-12 बॉडीगार्ड व सेक्युरिटी गार्ड पण कामाला ठेवलेत. त्यात आणखी भर म्हणून कि काय बाहेर पोलिसांची तुकडीही आली होती . आम्ही आता पर्यंत असे समजत होतो की एवढे संरक्षण फक्त राष्ट्रपतींना असते की काय. पण तुमची जहांगीर पाहून उर अभिमानाने भरून आला कि आमचे प्रेसिडेंट देशासाठी किती महत्वाचे आहेत ते पहा. (8000 लोकांची उधारी असेल तेव्हा एवढी सिक्युरीटी लागणारच पण असो)
कर्मवीर भाऊराव पाटलांची रयत ही केवढी मोठी संस्था.. जर सिंहगडचे संस्थापक NDA रोड वर फार्म हाऊस बांधू शकतात त्या हिशोबाने तर भाऊराव पाटलांनी तर व्हाईट हाऊस मध्ये राहायला पाहिजे होते असा एक विचार मला मनात येऊन गेला. पण पैश्यांचा योग्य वापर कसा करावा हे मी आपणाकडून शिकलो (भले मग ते पैसे कोणाचेही असोत)
या दोन-तीन महिन्यात आपण आम्हास खूप काही शिकवले...
सर्वात महत्वाचे म्हणजे १६ महिने पगार नसतानाही आपण निस्वार्थ पणे आपल्या कार्याला कसे वाहून घ्यावे हे आपण शिकविले नाहीतर आमच्या जागी दुसरा कोणी असता तर कधीच आत्महत्या करून मोकळा झाला असता..
आम्हाला आमचे अधिकारच माहित नव्हते एव्हाना आमच्यावर अन्याय झालाच तर कोणाला दाद मागायची हेही आम्हाला माहित नव्हते. आपण आम्हाला प्रत्येकाच्या म्हणजे AICTE, DTE, विद्यापिठ, समाजकल्याण, धर्मादाय आयुक्त, पोलीस स्टेशन इतकेच काय अगदी मंत्रालयातही जाण्यासाठी मजबूर केले. आणि बरं झालं केलंत ते नाहीतर आम्ही आयुष्यात कधी एवढ्या साऱ्या विभागांना व मंत्र्यांना भेट दिली नसती.
प्राद्यापकांना पोलिसांनी आपल्या गाडीतून पोलीस स्टेशन ला नेले गुन्हा काय? - १६ महिन्याच्या पगारासाठी शांततेत आंदोलन केले. |
पोलीस गाडीतून उतरताना प्राध्यापक |
एवढे मोठे साम्राज्य निर्माण करण्यासाठी आपण किती खस्ता खाल्ल्यात याचा विचार न करता आपण १६ महिने पगार काय केला नाही तर सगळ्या प्राध्यापकांनी एवढे वैतागण्यासारखे काय आहे त्यात.
२५ वर्षे आपण आपल्या रक्ताचे पाणी करून हे सर्व उभारले मग थोडे रक्त आपल्या प्राध्यापकांचे थोडे विद्यार्थ्यांचे व थोडे पालकांचे रक्त शोषून पिलात तर एवढा कुठे काय तुम्ही गुन्हा केलात. सगळे संस्थाचालक ते हेच करतात काही संस्थाचालक तर तुम्हालाच मार्गदर्शक मानून आपल्या पावलावर पाय टाकत आहेत. वेडे आहेत का ते लोक मग? आणि एवढ्या साऱ्या पैश्यांवर डल्ला मानून विजय मल्ल्या किंवा त्या निरव मोदी सारखे पळून न जाता इथेच सर्वांच्या नाकावर तिवंचून राहण्यासाठीची तल्लख बुद्धी आपल्या कडे आहे व आमच्याकडे नाही त्यात तुमची काय चुकी?
आपण आमची काही काळजी करू नका सर..!
आम्ही आता उपोषण सुरु केले आहे त्यामुळे आमचा जेवणाचा खर्च पण वाचलाय. १६ महिने पगार होत नाही हे पाहून लोक दयेने आमच्याकडे पाहतात त्यामुळे घरमालक, दूधवाले, ट्राफिक पोलिसवाले आता आमच्याकडे पैसेही मागत नाहीत. उन्हा-तान्हात फिरून आमची स्किन थोडी टॅन झाली आहे इतकेच (पैसे आल्यानंतर आपण आपल्या फॅमिली ब्युटी पार्लर वाल्याकसून आम्हाला फेशिअल करून द्यावे एवढीच विनंती. तोपर्यंत आम्ही शेविंग देखील करत नाही. तेवढेच पैसे वाचतील.)
बहुतेक वेळा आम्ही तुमच्याकडून ऐकले आहे की आपण सारे एकच फॅमिली आहोत. मग फॅमिली मधील 99 % लोकांनीच का नेहमी त्रास घ्यावा व मोजक्याच लोकांनी ऐषोआराम का करावा हे आमच्या मूर्ख आई-वडिलांना सांगूनही समजत नाही. त्यामुळे मी तर माझ्या घरी जाणेच बंद केले आहे. तीन दिवस सुट्टी आहे म्ह्णून घरी ये म्हणत आहे आई पण मला काम आहे म्हणून मी जायचे टाळले (उगाच पैसे खर्च नको म्ह्णून मी घरी येत नाही एवढी न समजण्याजोगी माझी आई आडाणी नाही तरीही). एवढे सांगूनही ऐकत नाहीत ते. उद्या येणार आहेत म्हणे भेटायला (पाहायला मी जिवंत आहे का ते). आणि उगाचच लहान असल्यासारखे आता गावाकडून भाजीपाला-धान्य आणि बरेच काही घेऊन येतील आता (जणू काही आता मी १६ महिने पगार नसल्याने उपाशी पोटी मारणार आहे कि काय असे त्यांना वाटत असेल)
असो.
आपणाकडून अजून बरेच काही शिकायचे आहे. जितके शिकवलं तितके कमीच आहे.
आपल्या प्राध्यापकाची प्रगती पाहून आपणाला आनंदच होत असेल असेल यात शंका नाही.
ते म्हणतात ना "प्रेसिडेंट सर - आज खुश तो बहोत होगे तुम ".. त्याप्रमाणे
काळजी घ्या. (म्हणून आपल्या दारासमोर GET WELL SOON असे लिहून आलोय)
पुन्हा एकदा नमस्कार,
आपलेच लाडके
सिंहगडचे प्राध्यापक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा