सोमवार, ५ मार्च, २०१८

#PaytoProfessor: Part VIII " शिक्षक आजच्या जगाचा, पगाराविना भिकारी"

प्रती,
परमेश्वर,
साष्टांग नमस्कार,

आज तुमच्या दगडूशेठच्या मंदिरात आपणास भेटायला आलो होतो. संकष्टी असल्यामुळे कदाचित तुम्ही बिझी असणार लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेण्यात त्यामुळे आपल्यासोबत सविस्तर बोलता आले नाही. एवढ्या लोकांनी आज तुम्हाला भेट दिली असेल त्यामुळे मी कोण ते अजून ओळखले नसल्यास एक खूण सांगू का? पांढऱ्या गांधी टोप्या घालून २०-३० लोकांची रांग आली होती पहा ज्यांवर 
"आम्ही बिनपगारी - आम्ही कर्जबाजारी"
"२५ वर्ष्यांची नवलाई - शिक्षकांना पगार नाही"
"गाजर नको-पगार द्या"
वगैरे वगैरे स्लोगन्स लिहिलेले होते... आठवलं ना,
हां त्यातलाच मी एक. 
  
आपल्या विविध मनाण्यांसाठी आंदोलनकर्त्यां शिक्षकांनी
 आज श्रीमंत दगडूशेठ गणपतीला साकडे घातले.   
एरवी मी काही ज्यास्त वेळा तुझ्या दारी आलो नाही. शेवटचं आलो होतो तेव्हा सिंहगड मध्ये जॉब मिळाला म्हणून पेढे  घेऊन आलो होतो मी. दहावी, बारावी, CET, BE, GATE, M.Tech करून नंतर डेमो, इंटरव्हिव  वगैरे किती उचापती केल्यानंतर हा जॉब मला मिळाला होता याची कल्पना तुला असेलच. कारण प्रत्येक परीक्षेवेळी मी तुझी आठवण नक्की काढली होती. तुही बऱ्यापैकी माझे ऐकून घेतोस कि काय कोणास ठाऊक.. कारण आजपर्यंत अपेक्षेएवढे मिळाले नसले तरी माझ्या प्रयत्नांच्या दृष्टीने योग्य तेवढे मिळाले हे मी आजिबात  नाकारत नाही. 

जॉब बद्दल कुरकुर नाहीये माझी.. 
शिक्षकच होणे माझे स्वप्न जरी नव्हते तरी आता मला माझे प्रोफेशन आवडते. समाधानही मिळते. महत्वाचे म्हणजे चारित्र चांगले राहते व विद्यार्थ्यांकडून रिस्पेक्ट जो मिळतो त्याचा आनंद तर वेगळाच आहे. 

पण गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून मी शिकविण्याचे बंद केले आहे. कारण तुला माहित असेलच. पण फक्त १६ महिन्यांपासून पगार झाला नाहीये म्हणून शिकवत नाहीये हे साफ खोटे आहे. असं असते तर पाच वर्ष्यापुर्वीच जेव्हा उशिरा पगार करण्याची पद्धत सुरु झाली तेव्हाच बंद केले असते. किंव्हा  दोन-तीन वर्ष्यांची प्रोफेशनच बदलले असते. पण मला माझे काम आवडते, शिकवणे आवडते, मग त्यासाठी थोड्या आर्थिक खस्ता खाल्य्या तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्ह्णून मी शिकवणे चालूच ठेवले. 

पण आता परिस्थिती बदलली आहे. शैक्षणिक सेवा करण्याची संधी तू ज्या संस्थाचालकांना दिली होतीस त्यांचा आता हेतूच बदलला आहे. कदाचित संस्था सुरु करताना त्यांचा उद्देश खरंच शिक्षणाला सर्वोच्च स्थानी ठेऊन त्याची सर्वतोपरी सेवा करणे हाच असेल म्ह्णूनच तू त्यांची एवढी साथ दिलीस आणि इतकी मोठी संस्था उभी झाली. आज मात्र त्यांच्यातला सारथी माणूस जागा झाला आहे व ८०००० विद्यार्थ्यांचे भविष्य व ८००० लोकांची घरे रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. 

प्राध्यापकांना आज फुटपाथवर यावे लागले न जानों
भविष्यात अजून काय वाडून  ठेवले आहे 
आली आहे कसली म्हणतोय.. 
सकाळपासून फुटपाथवरच बसून होतो. 
आमची सहनशक्ती कितीही असेल तरी आमच्या पगाराच्या जीवावर घरातील अजून ४ जणांचे पोट भरतो आम्ही. मागे-पुढे जर कोणीच नसते तर आयुष्यभर सेवा म्हणून शिक्षकी पेशा पत्करला असता. 

आणि हो १६ महिने सहन केलेच ना आम्ही, आमच्या घरच्यांनीही सहन केले. आता मात्र सहन होत नाहीये. तुझ्याकडे येण्या आधी आम्ही सगळया सरकारी संस्थांच्या लोकांसमोर आमचे मागणे मांडून आलो आहोत. पण शेवटी तीही माणसेच.. सोयीसुविधा आणि प्रशासनाच्या नावाखाली अशी व्यवस्था त्यांनी उभारली आहे कि मूळ प्रश्न सोडवणे बाजूला राहून एकत्र ते लोक आपली जबाबदारी हटकून देतात किंवा यातून आपला काय स्वार्थ साधता येतो हे पाहतात. म्हणून शेवटी आता तुझ्याकडे आलोय... 

सकाळी त्या फुटपाथवर आमच्या सोबत, अगदी जवळच एक भिकारीही होता. अगदी निवांतपणे लोळत होता. त्याला पाहून माझे मन भरून आले. दोघांमध्ये काहीच फरक राहिला आहे असं वाटत नव्हते. फक्त माझे कपडे नीटनेटके होते इतकेच. पण अश्या परिस्थितीतही त्याच्या चेहऱ्यावर भविष्याची काही चिंता वाटत नव्हती. आजचा दिवस तो माझा म्हणून जगत  आहे असे वाटत होते. काही खायला मिळाले तर ठीक नाहीतर उपाशी तर तो रोजच असतो. कपडे इमेज वगैरेचे काही देणेघेणे नाही.. मुक्ती सगळ्यांपासून... 

आम्ही मात्र आमच्याकडे दयेने कोण पाहत आहे का? कोणी आमचे म्हणणे, आमचे दुःख ऐकून घेण्यासाठी उत्सुखं आहे का हेच आपल्या केविलवाण्या चेहऱ्याने पाहत होतो. 

आमच्या बोलण्यात मुकेपणा आला आहे कि काय जे कोणालाच नीट ऐकू जात नाहीये 
कि सगळा समाज, सगळ्या संस्था, सर्व लोक जे जबाबदार आहेत त्यांच्या ऐकण्यात बहिरेपणा आला आहे..

आमच्या मागण्या रास्त  नाहीयेत  कि आता माणसांकडे करुणाच राहिली नाहीये..

आमचे प्रयन्त निष्फळ आहेत कि आमचा प्रश्नच नगण्य आहे..
हे ज्यामुळे कुठेच-कोणालाच-काहीच फरक पडताना दिसत नाहीये..

शेवटी म्हणून आता तुझ्या दारी जावे म्हणून आलो होतो. एवढ्या गर्दीत तुला ऐकू आले कि नाही कोणास ठेवून पण आमच्या प्रार्थनेत आम्ही तू लगेच आमचा सगळा पगार आम्हास मिळवून द्यावा अशी अपेक्षा केली नाही ते तर आमचे संस्थाचालकच करतील. पण आम्ही सर्व लोकांनी प्रार्थना केली कि या सर्व संस्थाचालकांना सद्बुद्धी दे कि जे काही पैसे हे लोक स्वतःच्या सार्थसाठी वापरत आहेत ते पालकांनी आपल्या पोटाला चिमटा काढून आपल्या मुलांच्या भविष्यासाठी ठेवले आहेत व त्यावर फक्त ८००० लोकांचे पोट  नसून ८००० कुटुंबांचे अवलंबून आहे. त्यांनी एवढे कष्ट घेतले त्यामुळे त्यांनी त्याची मलई खावी आत आमचे पाहू म्हणणे नाही पण शिक्षकांच्या आतड्याना कोरड पडे पर्यंत त्यांनी उच्छाद मांडला असेल तर भविष्यातील पिढ्यामध्ये कोणीही शिक्षक होण्यास तयार होणार नाही याची आम्हाला शिक्षक म्हणून भीती वाटते.

तुझ्या समोर ठेवलेल्या दानपेटी मध्ये टाकण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. म्हणून जाता जाता त्यात आम्ही आतापर्यंत मिळवलेल्या सर्व डिग्री सर्टिफिकेटची कागदे टाकून जात आहे. त्यांची आता गरज उरली नाही. कारण जीवन जगण्यासाठी फक्त एवढी  सर्टिफिकेटची हि कागदेच कामाला येतात यावरून आमचा विश्वास उडाला आहे.

संघर्ष मात्र आम्ही शेवटपर्यंत करत राहू...
शिक्षकांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देणे हेच आमच्या आंदोलनाचे अंतिम धेय्य आहे,
मग ते तुझ्या आशीर्वादांसोबत किंवा त्याच्या शिवाय..

पुन्हा एकदा नमस्कार..!

तुझाच 
त्या गांधीटोपी वाल्यांपैकी कोणीही एक शिक्षक  

   
      

1 टिप्पणी: