सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

# आम्ही नव्याण्णव नटरंग

# आम्ही नव्याण्णव नटरंग


'आम्ही' म्हणजे नेमाडेंनी म्हंटल्याप्रमाणे शंभरातील आम्ही नव्याण्णव जण, जे त्या शंभरातील एकटयासमोर टाळ्या वाजवत बसणारे.

आमच्या इच्छा आणि मिळकती यात काडीमात्र संबंध नाही.
आमचा जन्म कोणामुळे झाला एवढाच आम्हाला माहित.. कश्यासाठी जन्माला आलोत, कसे वागायचे, कसे राहायचे, काय खायचे, काय प्यायचे या आमच्या बद्दलच्या सगळ्या गोष्टी आम्ही कधीच ठरवत नाही. 

आम्ही जन्मालाच येतो दोन चेहरे घेऊन.. एक आतला आमचा स्वत:चा आणि एक बाकीच्यांना दाखवायचा..
सहसा आम्ही आमची आई वडिलांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या पृथ्वी वर अवतार घेतो. 
लहान पणा पासूनच आमच्या आजूबाजूचे लोक आमच्या समोर टाळ्या वाजवून आमचे मनोरंजन करतात जेणेकरून मोठे झाल्यावर आम्ही त्यांच्यासाठी टाळ्या वाजवू...

आम्ही काय शिकावं ते आम्ही कधीच ठरवत नाही. ते सगळे दुसरेच ठरवतात.. मग आमच्यातलाच कोणीतरी एखादा म्हणजे शंभरातील तो एकटा जेव्हा शाळेच्या स्नेहसंमेलनात स्टेजवर जावून सुंदर गाणे म्हणतो तेव्हा आम्ही त्याच्या समोर बसून टाळ्या वाजवतो. जेव्हा तो एकटा भाषण करतो तेव्हा देखील आम्ही समोर बसू टाळ्या वाजवतो. आम्हालाही आमच्या आतमधल्या चेहऱ्याला समोर आणून आमच्यासाठी कोणीतरी टाळ्या वाजवाव्यात अस नेहमी वाटत असते पण आम्ही कधी धाडस करत नाही. 

त्याने आपली स्वताची वाट शोधलेली असते. आम्ही आमच्या बाकीच्या टोळीसोबतची वाट पकडतो. कारण आम्हाला एकटे वेगळ्या वाटेने गेलोत तर हरवण्याची खूप भीती असते भलेही तो रस्ता आमच्या स्वप्नांकडे जाणार असेल.. आम्ही गर्दीचाच रस्ता पकडतो मग भलेही हा रस्ता कुठे जातो याचे आम्हाला भान नसेल तरी हरकत नाही. कारण आम्हाला गर्दीत राहण्याच एक वेगळच समाधान वाटत असते कि जर रस्ता चुकलाच तर सगळ्यांचा चुकेल, खड्ड्यात पडलो तर सगळेच पडतील.. मग तो पूर्ण रस्ता आम्ही देवावर भरंवसा ठेवून चालत राहतो.. तेही टाळ्या वाजवतच..!

आम्हाला आम्ही गेल्या २१ वर्षांमधे काय शिकलो आणि कश्यासाठी शिकलो ते समजत नाही. डिग्री झाल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या समोर उभा राहतो तो म्हणजे डिग्री झाल्यानंतर काय करायचं???
'त्या' एकट्याने अस काय वेगळ केल याचा विचार तेव्हा आम्ही करू लागतो, ते समजल तर ठीक. नाही समजत तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आणि समजल असत तरी त्याने ज्या वळणावर आपला रस्ता बदलला तिथे जाऊन परत सुरवात करण्याची रिस्क आम्ही घेत नाही. त्याने निवडलेल्या वेगळ्या रस्त्याच्या निर्णयाला आम्ही मग फक्त टाळ्या वाजवून तो श्रेष्ठ असल्याची कबुली देतो.


इथून पुढे मग टाळ्याच-टाळ्या,
कोणत्या तरी खाजगी कंपनीत आम्ही कसे बसे चिकटून जातो. याच कामासाठी आपण एवढा रस्ता चालत आलो का याच अवलोकन आम्ही करत नाही. कारण आम्हाला त्याचा त्रास होतो. आणि अवलोकन करून तरी काय उपयोग होणार म्हणून आम्ही देवाचा प्रसाद म्हणून त्याला कबूल करतो. तिथेही आमच खास काही चालत नाही.  कारण आमच्या डोक्यात या २१ वर्ष्यात जो काही कचरा भरून घेऊन आलोत आम्ही त्याचा इथे काही उपयोग नसतो. इथे फक्त बॉसने  वाक म्हंटल कि वाकायचं, धु म्हंटल कि धुवायच.. वाजव म्हंटल कि वाजवायच.. टाळ्या वाजवण्यात मग आम्ही कमी पडत नाही कारण आतापर्यंत त्याची खूप प्रक्टिस झालेली असते. 

आम्हाला त्याच्या समोर, त्याच्या साठी टाळ्या वाजवण्याशिवाय पर्याय नसतो. कारण आता आम्हाला एकट्याने राहणे जमत नाही.. जोडीदार हवा.. पण जोडीदाराच्या बापासमोर फक्त टाळी वाजवून चालत नाही. आमच्या स्वत:चा फ्लॅट हवा असतो. इथून मग आमच्या टाळ्यांची रांगच सुरु होते. आधी बँकेसमोर टाळ्या..
मग पगार वाढवण्यासाठी बॉस समोर टाळ्या (नियमित होत असेल तर), नसेल तर आधी पगार नियमित होण्यासाठी टाळ्या.. तरीही जमल नाही तरी जॉब बदलून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी टाळ्या.. आधीच्या बॉस समोर मग तुंबलेला पगार देण्यासाठी टाळ्या.. उभारून टाळ्या.. नंतर वाकून टाळ्या.. शेवटी झोपून टाळ्या..

एवढ्या टाळ्या वाजवल्यावर काय काय फरक पडतो कि लोक आम्हाला काय म्हणतात ते,
शेवटी ते आम्हाला हेच म्हणणार ना "आम्ही नटरंग"
ज्यांनी जिंदगी जगण्याच्या चढाओढीत आपल पुरुष्यत्व विसरलो ते... आम्ही सगळे नव्याण्णव जन "नटरंग"

आमच्या जगण्या - मरण्याची कुठे काही गिणती नाही.. आम्ही रोज मरतो रोज नवीन जन्म घेतो..
आम्हाला कुठे वेगळी आयडेनटीटी गरजेचे नाही.. आम्ही सगळे एकसारखेच.. मग ते कोणत्याही लिंगाचे, धर्माचे, वयाचे वजनाचे असोत..

आमच्या आयुष्यात कोणताही मोठा सस्पेन्स नाही.. कधी आम्ही मृत्युच्या दाढेतून बाहेर आलो आहोत अस झाल नाही.. किंवा कोणी आम्हाला मृत्युच्या दाढेतून बाहेर काढले असाही नाही. पुढे जाऊन म्हणाल तर आम्हीही कोणाला तशी मदत केली नाही.

आमची जिंदगी गेली ती टाळ्या वाजवण्यात.. म्हणजे थोडक्यात जुगाड करण्य्यात... कोणावर कधी मनापासून राग काढता आला नाही मग तो सरकारचा असो कि शेजारच्याचा असो.. चुकी आमची असो किवा नसो... आमचा राग आम्ही मरेपर्यंत सांभाळून ठेवला. कधी कोणावर मनापासून प्रेम केल नाही. केल तरी तीच किवा तोच मिळाला पाहिजे याचा अट्टाहास केला नाही.. मिळाली तर मिळाली नाही मिळाली तरी तिला कोण ना कोण तरी मिळेलच मलाही कोण ना कोण तरी मिळेलच.. नाहीच मिळाले तर हात कश्याला फक्त धुवायला दिलेत का..

आम्ही या जगात कधी येतो , कधी जातो कोणाला काही थांगपत्ता लागत नाही..
कोणी आमची आठवत काढत राहावी अस आम्ह काही पाठीमागे ठेवून जात नाही...
फक्त एकच गोष्ट आम्ही ठेवून जातो ती म्हणजे आमची दुसऱ्यांसमोर टाळ्या वाजवण्याची विरासत..

# असे आम्ही नव्याण्णव नटरंग..




  


    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा