सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

“किडनी ऑन सेल”

“किडनी ऑन सेल” 

“किडनी ऑन सेल”


       रघुनाथराव गावातील तसं बडे प्रस्थ.. जिल्ह्यातील एक नामवंत उद्योजक..
       स्वत:च्या मागे कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना स्वत:च्या हिमतीने, त्यांनी गेल्या ३० वर्ष्यांमध्ये अपार कष्ट सोसून आपले हे साम्राज्य उभारले. अनेक उद्योग धंद्यांबरोबर त्यांच्या स्वत:च्या बऱ्याच संस्था होत्या. जिल्ह्यातील बऱ्याच सामाजिक आणि राजकीय संस्थांमध्येही ते मोठ मोठ्या पदांवर ते कार्यरत होते. एकूणच रघुनाथराव म्हणजे त्या पंच क्रोशी मधील एक नावाजलेले व्यक्तिमत्व.

       टेबलाखालून च्या व्यवहारांमुळे त्यांनी आपल्या उद्यागत लागणाऱ्या बऱ्याचश्या परवानग्या मिळवल्या होत्या. त्यांची संपत्ती आणि नावलौकिक गेल्या १० वर्ष्यांमध्ये बराच वाढला होता.  सर्व प्रकारची सुख-समृद्धी त्यांच्या पायाशी लोळण घेत होती.
       वेळ बदलली , काळ बदलला, परिस्थिती बदलली तसे रघुनाथरावही बदलले व त्यांचे शौकही बदलले. ते व्यसनांच्या अधीन होत होते. पत्नी व्यतिरिक्त गावातील एका तरून विधवेचा ही ते सांभाळ करत होते. ती विधावा सुद्धा जगण्याचा एक आधार म्हणून त्यांना त्यांच्या पत्नी प्रमाणेच सर्व सुख देत होती बदल्यात तिला महिन्याचे काही  धान्य आणि खर्चाला थोडे पैसे मिळत असत.
          एका बाजूला रघुनाथरावांचा रुबाब शौक वाढत होता तर दुसऱ्या बाजूला त्यांची नैतिकता ढासळत होती. मोठ्या – मोठ्या लोकांमध्ये उठबस वाढली होती पण आपल्या पदरी असणारे नोकर चाकर , कर्मचारी यांच्या बद्दलचा आदरही कमी होत होता. पत्नी आणि त्या विधवेलाही ते तुच्छतेने वागवत.
       त्यांच्या वागण्यातील हा बदल त्या विधवेला आणि त्यांच्या पत्नीला जाणवत होता. त्या दोघानाही रघुनाथराव कडून एक एक मुलगे झाले होते. आता ते बऱ्यापैकी मोठेही झाले होते.
       त्यांच्या पत्नीला त्यांचा मुलाची आणि संपत्तीची काळजी होती. त्यांच्या पश्यातच सर्व संपत्ती आपल्या मुलाला मिळावी यासाठी ती धडपडत होती.
       विधवेला पूर्ण गाव रघुनाथरावची रखेल म्हणूनच ओळखत होते. तिच्या मुलाला तिने शहरात पाठवून दिले. तिथे एक हॉटेलात तो काम करू लागला. कधी कधीतो गावी आलच तर राखेलीचा मुलगा म्हणून त्याची लोक हेटाळणी करत असत. याला वैतागून त्याने गावी येणे कमी करत करत बंद केले. विधवा रघुनाथरावच्या तुकड्यांवर जगात होती.
       पुन्हा वेळ बदलली. रघुनाथांचे शौक आता अंगलट येत होते. बऱ्याच रोगांनी त्यांना आतून पोखरायला सुरवात केली. पत्नी काळजी करेनाशी झाली. मुलगाही बापावर गेला. बऱ्याच वाईट नादांना लागला होता. विधवेच्या घरी रघुनाथरावांचे जाने कमी होत होते. तीच बाई कधी कधी मग धान्य , पैसे संपले तर त्यांच्या घरी जाऊ लागली. साहजिकच त्यांच्या पत्नीला त्या विधवेचे घरी येणे पटत नसे. पत्नी त्या विधवेचा सडेतोड अपमान करत शिव्या देत हाकलून लावत असे. आपल्या पतीच्या अवस्थेला ही विधवाच जबाबदार आहे अस तिच्या मनात ठासून भरले होते.
       विधवेचे दिवस हलाखीत जात होते. रखेल म्हणून हेटाळणी वर कोणी कामही देत नसे. जो कोणी काम देण्यास पुढे येई बऱ्याच वेळी तो तिच्या कडून वेगळ्याच अपेक्षेने येत असे. ती लाचार झाली होती. रावांनी फक्त तिच्या शरीराचा उपयोग करून घेतला आणि आता तसा उपयोग करून घेता येत नसल्यामुळे आपली हालाखीची अवस्था झाली असल्याचे वाटून तिला वाईट वाटत असे.
       दारूच्या व्यसनामुळे रघुनाथरावानच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. पत्नी आणि मुलाने आपली किडनी देण्यासाठी नकार दिला. पण जोपर्यंत पूर्ण संपत्ती आपल्या मुलाच्या नावावर होत नाही तोपर्यंत आपल्या पतीला जिवंत ठेवण्यावाचून पर्याय नाही याची कल्पना पत्नीला होती. कमीत कमी पैश्यामध्ये कोणी किडनी देणार मिळतो का याचा ती शोध घेऊ लागली.
       रघुनाथरावांच्या बदललेल्या स्वभावामुळे पैसे घेऊनही कोणी किडनी देण्यासाठी तयार होत नसे. आणि जे कोणी तयार होत ते खूप साऱ्या पैश्याची मागणी करत त्यामुळे त्यांच्या पत्नीला ते मान्य होत नसे.
       विधवेचे दिवसही हलाखीचे होते. खाण्या पिण्याची पंचायत झाली होती. एक शेवटचा प्रयत्न म्हणून निर्लज्ज पणे पुन्हा रघुनाथाच्या दाराशी जाऊन भिक मागायची तिने ठरवले आणि ती निघाली. रघुनाथरावांच्या पत्नीने नेहानी प्रमाणे तिला दारातच उभी राहून शिव्या देऊ लागली. विधवा मान खाली घालून ऐकत होती तरीही तिला आतून राव येतील आणि काहीतरी मदत करतील या अपेक्षेने सहन करत होती.
       विधवेची अवस्था आणि गरज पाहून पत्नीला एक कल्पना सुचली तिने विधवे समोर एक प्रस्ताव ठेवला कि, जर विधवेने एक किडनी दिली तर तिला महिन्याला एक ठराविक रक्कम आणि धान्य देण्यात येईल.
       विधवा विचार करू लागली. ज्याचे चोचले पुरवण्यात तीच पूर्ण शरीर निकामी झालं, ते सांभाळन्यासाठी तिला त्यातलाच एक भाग द्यावा लागत होता. पण नाईलाज होता. ती तयार झाली.
       नाईलाजास्तव तिघानाही हा सौदा मान्य करावा लागला.
       रघुनाथरावानी आपली हयात ऐश आरामात घालवली पण या आजारपानात ते लाचार होते. जगण्यासाठी त्यांना हा सौदा मान्य करावाच लागला. त्यांच्या पत्नीला आपल्या पतीच्या संपत्ती मधला एक रुपायाही दुसऱ्याला देण्याची इच्छा नसताना तिला हा सौदा मान्य करावा लागला कारण रघुनाथराव जिवंत राहिल्याशिवाय तिला त्यांच्याकडून पूर्ण संपत्ती आपल्या मुलाच्या नावावर करून घेता येणार नव्हती. राहिली ती विधवा, तिचा तर अस्तित्वाचा प्रश्न होता आणि हा सौदा मान्य करण्यावाचून दुसरा पर्यायही तिच्याकडे नव्हता.

            
      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा